न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२४) :- वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून बेशिस्त वाहनचालकांवर वाकड वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. वाकड परिसरात अनेक ठिकाणी रस्ते मोठे असून, कुठेही वाहने पार्क करतात. बेशिस्त पार्किंगमुळे रस्ते अरुंद होत आहेत. शनिवारी, रविवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
चार दिवसात तब्बल १३२७ कारवाया करून तब्बल ९ लाख ८० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाकडमध्ये नव्याने झालेल्या मॉल परिसरात हा त्रास सर्वाधिक आहे. तो सोडविण्यासाठी वाहतूक विभागाच्या पथकाकडून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वाहने बेशिस्तपणे पार्किंग करणारे व काळ्या काचा लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
वाकड येथील फिनिक्स मॉल व थेरगाव येथील पदमजी पेपर मिल परिसरात ही कारवाई करण्यात येत आहे. त्यात ४०६ वाहनांवर कारवाई करून चार लाख ३७ लाखांचा दंड आकारला गेला. फिनिक्स मॉल परिसरात दिवसभरात ३०५ वाहनांवर दोन लाख ५०० रुपये दंड आकारला. चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांवर कारवाई करण्यात आली. पदमजी पेपर मिलसमोर बेशिस्तपणे पार्क केलेल्या ४७ वाहनांवर कारवाई करून ५० हजारांचा दंड आकारला गेला. पहिल्यांदा केलेल्या कारवाईत ५०० रुपये दंड व त्यानंतरही काळ्या काचा आढळल्यास त्या वाहनावर १,५०० प्रमाणे दंड आकारला.