- चौका-चौकांत फलकावरून थकबाकीदारांची नावं जाहीर करणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०५ एप्रिल २०२४) :- हद्दीतील मिळकतधारकांनी आपला थकित कर त्वरित भरावा, अन्यथा मिळकतधारकांची नावे प्रथम प्रभागनिहाय चौकाचौकांत फलकावरून प्रसिद्ध केली जातील. तसेच ती नावे विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जातील. याबाबतचा निर्णय देहूनगर पंचायतीने घेतला आहे. त्यानंतरही मिळकधाकांनी थकित कर न भरल्यास त्यांच्या मालमत्तांना टाळे ठोकण्यात येणार असल्याची माहिती, करसंकलन विभाग प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.
देहुनगर पंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या वतीने मिळकतकर थकबाकीदारांना, सूचना नोटीस, दवंडी देणे. मिळकतधारकांच्या दरवाजात जाऊन ढोल वाजवून थकित कर भरण्याविषयी आवाहन करणे, अशा विविध मार्गांचा अवलंब करून मिळकतकर थकबाकीदारांना जागृत करण्यात आले होते.
नियमानुसार आर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपले आहे. त्यामुळे माघील आणि चालू वर्षांचा मिळकतकराची रक्कम वाढणार आहे. विविध मार्गान मिळकतकर थकबाकीदारांना जागृत करण्याचे काम नगरपंचायतीने वारंवार केले; परंतु थकबाकीदार मिळकतकर भरत नसल्याने आता नगरपंचायत प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
माघील आठवड्यात देहूनगर पंचायतीने कर थकबाकीधारकांच्या चार मालमत्तांना टाळे ठोकले होते. अनेक नळजोडधारकांनी पाणीपट्टी भरली नसून त्याची थकबाकीची रक्कमही वाढत आहे. पाणीपट्टीची रक्कम लवकर भरावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभाग प्रमुख धनंजय नायकवडे यांनी केले आहे.











