- कुठला पॅटर्न होणार यशस्वी; पवार घराण्याची प्रतिष्ठाही पणाला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२४) :- शिरूर लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
शिरूर लोकसभेचा विचार केला, तर आंबेगाव येथील सहकारमंत्री दिलीप वळसे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, हडपसरचे आमदार चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे तब्बल चार आमदार व एक मंत्री आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे अशी मोठी ताकद आढळरावांच्या पाठीशी आहे. खासदार डॉ. कोल्हे यांच्यासोबत शिरूरचे एकमेव आमदार अशोक पवार व काही माजी आमदार आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळीही त्यांच्याकडे आहे. गावपातळीवर राबणारी पक्षाची प्रभावी कार्यकर्त्यांची फळी कोल्हे यांच्याकडे कितपत आहे, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे एवढी मोठी ताकद असताना कोल्हेंचा उधळलेला चौफेर वारू कसा रोखायाचा, हे मोठे आव्हान आढळरावांपुढे नक्कीच राहणार आहे. कोल्हे भावनिक साद घालून प्रभावी भाषणात तरबेज आहेत.
शिरूर मतदारसंघात महायुतीत असलेल्या पाच आमदार नेत्यांनी आपापल्या तालुक्यातून आढळरावांना मताधिक्य दिल्यास त्यांचे पुढील विधानसभेचे गणित अधिक सोपे होण्याची शक्यता आहे. शिरूरमध्ये कोल्हेंकडे आमदारांची ताकद नसली तरी शरद पवारांना मानणारा मतदारसंघातील प्रत्येक तालुका अशी ओळख आहे. आपल्या राजकीय चातुर्य खेळीने अनेक भल्याभल्यांना राजकारणातून नेस्तनाबूत करणारे मुरब्बी आणि ‘गेम चेंजर’ म्हणून ओळखले जाणारे मोठे पवार ऐनवेळी कोणती खेळी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवसेनेचे व काँग्रेसचे कार्यकर्ते हेही कोल्हेंसाठी जिवाचे रान करतील. तसेच प्रति डाव टाकण्यात मोठ्या पवारांच्याच मुशीत तयार होऊन कसलेले अजित पवार हेसुद्धा कोणता डाव टाकतील याचा काहीच भरवसा नाही.











