- आधीच्या पुरवठादार संस्थेकडून किळसवाणा प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२४) :- कंपनीत पुरविण्यात आलेल्या समोसामध्ये निरोध, दगड आणि विमल पान मसाला, तंबाखुजन्य गुटखा आढळला आहे. ही घटना (दि.२७.०३.२०२४) रोजी चिखलीतील एका नामंकित कंपनीत निदर्शनास आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खादय पदार्थ पुरविण्याचा करार तक्रारदार यांच्या कंपनीसोबत झालेला आहे. तक्रादार यांच्या कंपनीने समोसा पुरविण्यासाठी मोरवाडीतील एका संस्थेबरोबर करार केलेला होता. त्यांच्याकडून पुरविण्यात आलेल्या एका समोसामध्ये प्रथमोपचार पट्टी मिळुन आल्याने कंपनीने समोसे पुरविण्याचा करार रद्द केलेला होता. त्यानंतर तक्रारदार यांचा कंपनीने समोसा पुरविण्यासाठी दुसऱ्या संस्थेसोबत करार केला आहे.
दरम्यान आधीच्या संस्थेसोबत असलेला समोसा पुरवठा करण्याचा करार रद्द केल्यामुळे त्या संस्थेच्या मालकाने तक्रादाराच्या कंपनीची प्रतिष्ठा मलीन व्हावी, त्यांचा मोठ्या कंपनीमधील असलेला करार रद्द व्हावा, याकरिता आरोपी क्र १ ते ३ यांनी त्यांच्याकडील कामगार आरोपी क्र ४ व ५ यांच्यासोबत कट कारस्थान रचुन दोन्ही कामगारांना तक्रारदार यांना समोसा पुरविणा-या संस्थेतील कारखान्यामध्ये रोजदांरीवर कामाला पाठवले. आरोपी क्रमांक १ ते ३ यांच्या सांगण्यावरुन आरोपी क्रमांक ४ व ५ यांनी समोसा खादय पदार्थामध्ये निरोध टाकुन किळसवाणा प्रकार केलेला आहे. तसेच दगड, विमल पान मसाला, तंबाखुजन्य गुटखा सेवन केल्यामुळे तोंडाचा कर्करोग व इतर विकार होवुन शरिराची हानी होवु शकते हे माहित असताना देखील जाणीवपुर्वक समोसामध्ये टाकला, असं फिर्यादीत नमूद आहे.
३६ वर्षीय फिर्यादीने आरोपी १) रहीम शेख, २) अझर शेख, ३) मझर शेख, ४) फिरोज शेख ऊर्फ मंटु, ५) विकी शेख यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिखलीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्र ४ अटकेत आहे. सपोनि न्यामणे तपास करीत आहेत.