न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीत जाण्याबाबत दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून पोलिस अंमलदाराने आजारी असल्याचे खोटे कारण सांगितले. त्यामुळे त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. पिंपरी-चिंचवडचे अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी बुधवारी (दि. १७) तसे आदेश दिले.
भूषण अनिल चिंचोलीकर (नेमणूक मुख्यालय, पिंपरी-चिंचवड), असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नाव आहे. दि. १२ ते २१ एप्रिल २०२४ या कालावधीत लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ५० कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत आदेश मिळाले होते. त्याअनुषंगाने आयुक्तालयांतर्गत ५० कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नेमणूक झाली. त्यामध्ये चिंचोलीकर यांचाही समावेश होता.
दरम्यान, या कर्मचाऱ्यांची १० एप्रिल रोजी निगडी येथे पोलिस मुख्यालयात हजेरी घेण्यात आली. त्यावेळी चिंचोलीकर गैरहजर होते. आजारी असल्याचे चिंचोलीकर यांनी फोनवरून मुख्यालयाला कळविले होते.
भूषण चिंचोलीकर यांच्या आजारपणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ संजय काले यांच्याकडे चौकशी झाली. त्यावेळी भूषण चिंचोलीकर जुलाब, उलटी, ताप, पोटदुखीचा त्रास होत असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी व औषधोपचारासाठी आले होते, असे डॉ. काळे यांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल होऊन तपासण्या करण्यास सांगितले होते. मात्र, चिंचोलीकर यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. त्यांना होत असलेला त्रास गंभीर स्वरूपाचा नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक केलेली असतानाही आजारी असल्याबाबत खोटे कारण सांगून बंदोबस्त चुकविण्यासाठी ते गैरहजर राहिले. वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आदेशाची अवहेलना केली. त्यांचे हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजी पणाचे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले.