- परीसरात गुंडगिरी व दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२४) :- रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर यास चिखली पोलीसांनी तडीपार केला आहे. ज्या सराईत गुन्हेगाराच्या वर्तनात सुधारणा झाली नाही त्याच्याविरोधात मोका, तडीपार यासारख्या कठोर करवाया करण्यात आलेल्या आहेत.
चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय-२२ वर्षे रा.पंचवटी हौ. सोसा. गल्ली नं. २ यश प्लाजा जवळ, शरदनगर, चिखली) याच्या वर्तनातही सुधारणा होत नव्हती. तो काहीएक कामधंदा करीत नसुन त्याने स्वतःची गँग तयार केलेली होती. तो घातक शस्त्रे जवळ बाळगुन चिखली पोलीस स्टेशनच्या व आसपासच्या परिसरात त्याचे गुंड साथीदारांसह गंभिर स्वरुपाचे गुन्हे नियमितपणे करीत होता.
त्याच्यावर चिखली पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी, अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, गंभीर दुखापती करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असुन त्याच्या या गुंडगिरी व दादागिरीमुळे चिखली परीसरात दहशत निर्माण झालेली होती. त्याच्या दहशतीमुळे व भिती पोटी सर्व सामान्य नागरीक त्यास विरोध करण्यास किंवा पोलीसांकडे तक्रार देण्यास सहसा धजावत नव्हते. त्याच्या गुंडगिरीमुळे परिसरातील सभ्य नागरीक तसेच लहान मोठे व्यवसायीक, गोरगरीब जनता याना दैनंदिन जिवन जगणे, व्यवसाय करणे कठीण होत चालले होते.
त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्याची असलेली दहशत व गुंडगिरी मोडुन काढण्याच्या उद्देशाने चिखली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी त्याच्याविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ ३ यांना सादर केला होता. त्यांनी या प्रस्तावाची गंभीरपणे दखल घेत रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर यास पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय व पुणे ग्रामिण चे हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार आज रोजी आरोपी आदर्श उर्फ़ मोन्या विठठल लुडेकर यास दोन वर्षाकरीता नागपुर येथे तडीपार केलेले आहे.
पोलीसांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकामध्ये सुरक्षतेची भावना निर्माण झाली असुन चिखली परिसरातील नागरिकांनी पोलीसांच्या या तडीपारीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. चिखली परीसरात गुंडगिरी व दहशत निर्माण करणा-या गुन्हेगारावर यापुढेही अश्या प्रकारची कडक कारवाई करण्यात येइल, असे आश्वासन चिखली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी नागरीकांना दिले आहे.














