- फलकधारकांनी तत्काळ शुल्क भरून महापालिकेस सहकार्य करावं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरात १ हजार १३६ जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. त्यात काही फलक हे दोन्ही बाजूने आहेत. आतापर्यंत ९१० जाहिरात फलक धारकांना आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून परवाने देण्यात आले आहेत. ते सर्व अधिकृत फलक असून, त्यांनी नूतनीकरण करून घेतले आहे. परवाना नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने परवानगी देण्यात येत असते. फलक परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक असताना शहरातील ९१० फलकधारकांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून परवाने घेतले आहेत. उर्वरित जाहिरात फलकधारकांनी त्वरीत परवाना घ्यावा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
परवाना घ्या अन्यथा दंडात्मक कारवाई करू, असा इशारा पालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिला आहे. एक एप्रिलनंतर ३ महिने परवाना शुल्क न भरल्यास १० टक्के दंड केला जाणार आहे. सहा महिने शुल्क न भरल्यास २५ टक्के दंड करण्यात येणार आहे. तसेच, परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. दंड व कारवाई टाळण्यासाठी जाहिरात फलकधारकांनी तत्काळ शुल्क भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही खोत यांनी केले आहे.