- पिंपरी-चिंचवडसह तळेगावचा वाहनचालक कामगार वर्ग अडकलाय खड्ड्यांच्या चक्राव्यूव्हात..
- आमदार सुनील शेळके यांचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मे २०२४) :- चाकण एमआयडीसी, फेज-दोन आणि मावळ, खेड तालुक्याला जोडणाऱ्या सुदुंबरे ते वासुली रस्त्यावर सिद्धांत कॉलेजच्या गेटपर्यंत डांबरीकरण झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षाच्या आतच मधोमध मोठे खड्डे पडल्याने रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. चाकण एमआयडीसीमध्ये रोज ये-जा करणाऱ्या छोट्या-मोठ्या वाहनचालकांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्याला भगदाड पडले आहे. लवकरात लवकर रस्ता रुंदीकरणासह प्रशस्त रस्त्याची निर्मिती व्हावी, अशी आस येथील चाकरमानी वर्ग त्यांचाकडे लावून आहे.

खेड तालुक्यातील वासुली ते सुदुंबरे मार्गे राज्य मार्ग ५५ ला मिळणाऱ्या रस्त्याचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, पुणे यांच्यामार्फत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५० लक्ष खर्चून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, डांबरीकरण करताना कामाचा दर्जा न राखला गेल्यामुळे कदाचित गेल्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर या रस्त्यावरील डांबर निखळून खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा आकार वाढत चालल्याने वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे.

चाकण-तळेगाव रस्त्यावर एचपी चौक, महिंद्रा सर्कल, खालुंब्रे गाव, तळवडे ब्रिज, चिखली या भागात कायम गर्दी व वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक प्रवासी वासुलीनजीकच्या सुदुंबरे गावच्या एनडीआरएफ गेट जवळील या रस्त्याचा वापर करतात. वाहतूक कोंडी होत नाही, शिवाय वेळेची बचत होते. मात्र, दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे व दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीत जाणारे अनेक कर्मचारी या रस्त्याचा दररोज वापर करतात. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.

दरम्यान सुदुंबरे ग्रामपंचायतीने अवजड वाहनांना बंदी घालूनही, रात्रीच्या वेळी येथे गौण खनिजाची वाहतूक करणारे डंपर मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. त्यातच आता रस्त्यावर मधोमध मोठे खड्डे पडल्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. चाकण एमआयडीसीला जोडणाऱ्या या रस्त्यावरून रोज शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने, स्कूल बस ये-जा करतात. सुदुंबरे-वासुली रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आहे.
‘सुदुंबरे-वासुली रस्ता चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी आणि जवळचा रस्ता आहे. पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे परिसरातील शेकडो कामगार रोज या रस्त्यावरून चाकण एमआयडीसीत ये-जा करतात. तो सध्या खराब अवस्थेत आहे. बांधकाम विभागाकडे नवीन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी सुमारे एक कोटी सत्तर लाखांचा निधी मंजूर आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच प्रत्यक्ष रस्त्याच्या उभारणीला गती येईल. – मा. कालिदास गाडे (सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक)…
‘‘सुदुंबरे ते वासुली या रस्त्याचा दोषदायित्व कालावधी संपला आहे. विचाराधीन असलेल्या नवीन सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी शिफारस केलेला सुमारे एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचा निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे दुरुस्ती केली जाईल.’’
– प्रभाकर पाटील, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग…


















