- निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रमुख उमेदवारांसह इतरांची नोटीसीद्वारे कानउघडणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२४) :- निवडणुकीतील दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीसाठी उपलब्ध करून न दिल्याबद्दल मावळ लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या ६ उमेदवारांना तसेच निवडणुकीतील दैनंदिन खर्च तपासणीसाठी सादर केल्यानंतर त्यामध्ये आढळून आलेल्या तफावतीसाठी ३ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस बजावली आहे.
शिवाजी किसन जाधव, सुहास मनोहर राणे, इन्द्रजीत धर्मराज गोंड, इकबाल इब्राहिम नावडेकर, लक्ष्मण सदाशिव अढाळगे, अजय हनुमंत लोंढे या उमेदवारांनी निवडणुकीतील दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीकरीता उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे त्यांना नोटीस बजावली आहे. तर, निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीसाठी सादर केला असताना त्यात आढळून आलेल्या तफावतीसाठी माधवी नरेश जोशी, संजोग भिकू वाघेरे पाटील आणि श्रीरंग चंद बारणे या तीन उमेदवारांना नोटीस दिली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीला अनुसरुन उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झाली. निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक सविता नलावडे यांच्या अधिपत्याखाली पार पडली. या प्रसंगी उमेदवारांनी निवडणुकीला अनुसरुन केलेल्या खर्चाची तपासणी करण्यात आली. यामध्ये दैनंदिन खर्च लेखे तपासणीसाठी उपलब्ध न करुन दिल्याबद्दल सहा उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा होणारा रोजचा खर्च आकुर्डीतील मावळ लोकसभा मतदारसंघ कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्षात शुक्रवारी (दि. ३) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याबाबत कळविले होते. मात्र, सदरची नोंदवही व खर्चाचे प्रमाणके उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने तपासणीसाठी शुक्रवारी सादर केले नाही. नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत उमेदवाराला खुलासा सादर करावा लागणार आहे. तसेच, पुढील दुसऱ्या तपासणी वेळी निवडणुक खर्चाचे लेखे निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावे लागणार आहे. विहीत मुदतीत खर्च सादर न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच वाहने, सभा आदींसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तत्काळ रद्द करण्यात येतील, असे देखील नोटीसमध्ये नमूद आहे.
निवडणुकीतील दैनंदिन खर्च तपासणीसाठी सादर केला असताना त्यात आढळून आलेल्या तफावतीसाठी तीन उमेदवारांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, शुक्रवारी (दि. ३) आपल्या प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत संबंधित उमेदवारांनी दैनंदिन खर्च निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी उपलब्ध करुन दिलेला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोंदविलेल्या शॅडो रजिस्टरसोबत या खर्चाची तुलना करता हा खर्च खरा व योग्य वाटत नाही. अथवा, खर्चाचा काही भाग समाविष्ट केलेला नाही, असे नोटीसमध्ये नमूद आहे. तसेच निदर्शनास आलेली तफावतीची रक्कम देखील नोटीसमध्ये नमूद केली आहे. अमान्य तफावतीबाबत संबंधित नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या उमेदवाराने खुलासा सादर करावा. पुढील तपासणीच्या वेळी संबंधित निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावे. विहीत मुदतीत उमेदवारांचे म्हणणे प्राप्त न झाल्यास नोटीसमधील नमुद खर्च त्यांना मान्य आहे, असे गृहीत धरुन त्यांच्या निवडणुक खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. नोटीसमध्ये नमुद तफावत उमेदवारांना मान्य असल्यास संबंधित खर्चाचा समावेश उमेदवाराने खर्च नोंदवहीत करावा. तसे सूचित करावे, असे देखील नोटीसमध्ये नमूद आहे.