न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- मंगळवार दिनांक २५ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा पार पडली. यात दिघी, बोपखेल परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ नगरसेवक विकास डोळस यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना वेठीस धरले.
अनेक दिवसांपासून या परिसरात पाण्याची समस्या भेडसावत असून लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. खूप मोठा गाजावाजा करून शहरात महापालिकेने २४x७ पाणीपुरवठा योजना आणली, परंतु ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मनमर्जीमुळे या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून ठेकेदार व पालिकेतील अधिकारी आपल्या मर्जीने या योजनेचे काम रेटत आहेत. त्यामुळे काम पूर्णत्वास येत नसून प्रभागातील समस्या आणखी वाढतात.
महापालिकेने प्रभागात ज्या ठेकेदाराला या योजनेचे काम दिले आहे त्याने परिसरात जागोजागी उखडा- उखड करून ठेवली आहे त्यामुळे वाहने ‘स्लीप’ होऊन अपघाताची शक्यता बळावत आहे व पाण्याची पाईपलाईन नादुरुस्त होऊन प्रभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
महापालिकेने तात्काळ प्रभागातील या समस्या मार्गी लावाव्यात व संबंधित ठेकेदारला काळ्या यादीत टाकावे अन्यथा नागरिकांच्या वतीने पालिकेवर हंडा मोर्चा आणला जाईल या शब्दात नगरसेवक डोळस यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना खडसावले.










