मराठा क्रांती समाजाकडून कोणत्याही पक्षाची घोषणा नाही.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क :
मुंबई प्रतिनिधी :- परळी येथील आंदोलन मोडीत काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातील काही स्वयंघोषित समन्वयकांनी वेगवेगळी आंदोलने सुरू केली. परळी येथून शांततेत आंदोलनाचा इशारा दिलेला असताना राज्यात औरंगाबाद येथून जलसमाधी सारखे आंदोलन कोणी जाहीर केले? या आंदोलनात गोदावरी नदीत उडी मारून काकासाहेब शिंदे या तरुणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले ?
काकासाहेब शिंदे या तरुणाचा नाहक बळी गेला. सदर आंदोलन कोणी जाहीर केले होते ? कोणाच्या सांगण्यावरून जाहीर केले होते ? आबासाहेब पाटीलांनी पत्रकार परिषद घेऊन असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
समाजाला विश्वासात न घेता व काही स्वयंघोषित समन्वयक बनून वेगवेगळ्या पक्षातील प्रमुखांना, आमदार, मंत्र्यांना समाजाच्या नावावर भेटून मराठा क्रांती मोर्चा राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काही स्वयंघोषित नेते म्हणवून घेणारे, मराठा समाजाच्या नावावर पक्ष काढणाऱ्यांनी मराठा क्रांती मोर्चाचा वापर करू नये.
चंद्रकांत दादा पाटील काही स्वयंघोषित समन्वयकांना घेऊन समाजाची फसवणूक करीत आहेत. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याबाबत तुळजापूर मध्ये बैठक घेण्यात येणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे’, असे मराठा क्रांती मोर्चाच्या आबासाहेब पाटीला यांनी सांगितले आहे. ही बैठक राज्यव्यापी बैठक होईल आणि त्यातच निर्णय होईल.
इथून पुढे मराठा समन्वयकांना ओळखपत्र असेल
मराठा क्रांती मोर्चा / सकल मराठा समाज या नावाने कोणताही पक्ष / संघटना स्थापन करून समाजाची एकजूट मोडीत काढण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कोणीही गैरवापर केल्यास मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने धडा शिकवला जाईल, अशी माहिती आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मराठा क्रांती समाजाकडून कोणत्याही पक्षाची घोषणा नाही
मराठा क्रांती मोर्चा कोणताही पक्ष स्थापन करणार नाही. जर असा कोणता पक्ष स्थापन झाला तर त्याचा मराठा क्रांती मोर्चाची संबंध नसेल. मराठा क्रांती मोर्चा ही जन-चळवळ आहे. राजकीय पक्ष नाही. जो पक्ष स्थापन झालाय त्याला मराठा समाजाची मान्यता नाही.
















