- काम अडीच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२४) :- पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रोने प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विस्तारित मेट्रोच्या मार्गाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ४.५१ किलोमीटर मार्गिकचे काम अडीच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात मोरवाडी पिंपरी ते फुगेवाडी असे काम करण्यात आले. त्यानंतर सिव्हल कोर्टपर्यंत मार्ग पूर्ण करण्यात आला. तेथून पुढे स्वारगेटपर्यंत मार्ग पूर्ण करण्यात आला. फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर सहा मार्च २०२२ रोजी तर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्गावर ऑगस्ट २०२३ प्रवासी वाहतूक सुरू झाली होती. मात्र, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती.
या विस्तारित मार्गाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर पुणे मेट्रो प्रशासनाने १६ डिसेंबर रोजी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन ६ मार्च रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन केले होते. त्यानुसार या कामाला आता सुरुवात झाली या कामाला सुरुवात झाली असून भक्ती-शक्ती चौक आणि पवळे ब्रीज येथे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.
आज निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली. ही पिंपरी-चिंचवडकरांची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. यासोबतच आगामी काळात हिंजवडी-वाकड-पिंपळे सौदागर- भोसरी-चाकण असा मेट्रो विस्तारासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड…











