न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२४) :- इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भातील घोषणा परिपत्रकाद्वारे केली. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजेच २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता आता संपुष्टात येणार आहे.
विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाइन निकाल पाहू शकतात. https://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://sscresult.mahahsscboard.in, https://results.digilocker.gov.in, https://results.targetpublications.org या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे.
ऑनलाइन निकालानंतर दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २८ मे ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येईल.