- मतमोजणीची जय्यत तयारी; निवडणूक अधिकाऱ्यांनी केल्यात खास सूचना..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणीच्या विधानसभानिहाय २३ आणि २५ फेऱ्यानंतर मावळच्या खासदारांची घोषणा होणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचे १३ मे २०२४ रोजी मतदान पार पडले आहे. या लोकसभा मतदार संघामध्ये २५,८५,०१८ एवढे मतदार होते. त्यापैकी १४,१८,४३९ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून ५४.८७ टक्के इतके मतदान झालेले आहे. मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून सुरु आहे, अशी माहिती मावळ लोकसभा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मंगळवारी (दि. २८) रोजी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघाची मतदानाची मतमोजणी वेट लिफ्टिंग हॉल, शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे ०४/०६/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजता सुरु होणार आहे. टपाली मतपत्रिका व EVM मशीन भारत निवडणूक आयोगाच्या सुचनानुसार सशस्त्र पोलिस सुरक्षेत ठेवण्यात आलेल्या आहेत. सुरक्षाकक्ष दि.०४/०६/२०२४ रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता मतमोजणीकरिता उमेदवार/निवडणूक प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरिक्षक यांच्या उपस्थितीत उघडण्यात येईल. त्यासाठी उमेदवार/ त्यांचे निवडणूक प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.
१८८ पनवेलमध्ये ५०.०५ टक्के मतदान झाले असून मतमोजणी फेऱ्या २३ इतक्या होणार आहेत. १८९ कर्जतमध्ये ६१.४० टक्के मतदान झाले असून मतमोजणी फेऱ्या २५ इतक्या होणार आहेत. १९० उरणमध्ये ६७.०७ टक्के मतदान झाले असून मतमोजणी फेऱ्या २५ इतक्या होणार आहेत. २०४ मावळ ५५.४२ टक्के मतदान झाले असून मतमोजणी फेऱ्या २५ इतक्या होणार आहेत. २०५ चिंचवडमध्ये ५२.२० टक्के मतदान झाले असून मतमोजणी फेऱ्या २३ इतक्या होणार आहेत. २०६ पिपरीमध्ये ५०.५५ टक्के मतदान झाले असून मतमोजणी फेऱ्या २५ इतक्या होणार आहेत. एकूण विधानसभा मतदार संघ निहाय झालेली मतदानाची टक्केवारी ५४.८७ टक्के इतकी आहे. सर्व तयारी पारदर्शक पद्धतीने सुरु असून मावळ लोकसभेचा खासदार आम्ही ठरविणार असल्याचा दुजोरा त्यांनी दिला.
मतमोजणीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना..
प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय वरीलप्रमाणे मोजणी टेबल लावण्यात येणार असून प्रत्येक EVM मतमोजणी टेबलला १ याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधी (एकूण १०८) नियुक्त करता येतील. टपाली/ATPBS मतमोजणी टेबलसाठी ५ प्रतिनिधी नियुक्त करता येतील, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे टेबलसाठी १ प्रतिनिधी नियुक्त करता येईल.
मतमोजणी प्रतिनिधीना या कार्यालयाने पुरविलेल्या ओळखपत्राव्दारे तसेच उमेदवाराने दिलोल्या नमूना 18 ची दुय्यम प्रत तपासून आणि Declaration वर सही घेऊनच मतमोजणी परिसरामध्ये प्रवेश दिला जाईल, तसेच त्यांना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देतेवेळी त्यांची तपासणी / झडती दोन स्तरावर करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये नेमून दिलेल्या टेबल व्यतिरिक्त मतमोजणी प्रतिनिधीना इतरत्र फिरण्यास सक्त मनाई असेल, याबाबत उमेदवार यांनी त्यांचेकरीत नेमून घेतलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्यांचे स्तरावरुन सूचना द्यावी. मतमोजणी कक्षामध्ये शिस्त पाळणे अनिवार्य आहे.
त्याचप्रमाणे, मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेन्जर, कैलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच इ. इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स सोबत आणण्यास बाळगण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे सदर साधने व उपकरणे सोबत आणू नये तसेच उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधीना याबाबत सूचना देणे अनिवार्य आहे. या अटी शर्तीच्या अधिन राहूनच उमेदवारांना तसेच त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणी परिसरात प्रवेश देण्यात येईल.
मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे.
मतमोजणी प्रतिनिधीना CU क्रमांक व CU सीलबंद असलेची खात्री करता येईल.
मतमोजणी टेबलवर केवळ CU 17(C) चे फॉर्म आणण्यात येणार असून मतमोजणी प्रतिनिधीना ते हाताळता येणार नाही, परंतु त्यांना टेबलनिहाय निकाल दाखवण्यात येईल.
कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, निवडणूक घेणेबाबतचा नियम 1961, नियम 53 (4) अन्वये निवडणूक निर्णय अधिकारी हे कुठल्याही गैरवर्तणूक करणाऱ्या व्यक्तीस मतमोजणी केंद्राचे बाहेर काढू शकतील.
भारत निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या ठिकाणी वागणूक वर्तणुकीच्या बाबतीत स्पष्ट निदेश दिलेले असून शिस्तबद्ध वातावरणामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराने किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधीने किया मतमोजणी प्रतिनिधीने मतमोजणी परिसरामध्ये शिस्तीचा भंग केल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने भारतीय दंड संहिता लोकप्रतिनिधीत्व अधिनियम व तत्सम कायद्याप्रमाणे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रे व निवडणुकीशी संबंधीत कागदपत्रे मोहोरबंद करण्यात येणार आहेत, उमेदवार निवडणूक प्रतिनिधींना सदर मतदानयंत्रे व कागदपत्रांवर सिलबंद करतेवेळी हजर राहत्ता येईल व सील लावता येईल.
मतमोजणी प्रतिनिधीचे ओळखपत्र दि.०१.०६.२०२४ पूर्वी संबधित उमेदवार अथवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे.
मतदान प्रतिनिधी एकदा मतमोजणी कक्षातून बाहेर गेल्यास त्यास पुन्हा प्रवेश मिळणार नाही.











