- तपासाची गती वाढणार; शहरासाठी १९ वे पोलिस ठाणे मंजूर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२४) :- ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार पिंपरी- चिंचवडनगरीमध्ये वाढले आहेत. मात्र, स्वतंत्र पोलिस ठाणे नसल्याने गुन्ह्यांची उकल करण्यात, तपासाची गती वाढविण्यात अडथळे येत होते. आता राज्याच्या गृहविभागाने पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे मंजूर केले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. शहराला आता १९ वे पोलिस ठाणे मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी आहे. या औद्योगिकनगरीची लोकसंख्या तीस लाखांवर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ मध्ये निर्माण केले होते. त्यामुळे गुन्हे तपासाला गती मिळाली.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पिंपरी- चिंचवड, शहरासह चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसराचा समावेश होतो. एकूण १८ पोलिस ठाण्यांचे कार्यक्षेत्र आयुक्तालयांतर्गत येते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे नसल्याने ऑनलाइन फसवणूक होण्याची उकल होण्यासाठी विलंब लागत होता.
पोलिस आयुक्तालयाच्या सायबर कक्षामध्ये १ पोलिस निरीक्षक आणि साधारणपणे आठ जणांचे कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचारी वर्ग होता. त्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुक, सोशल मीडियावरील गुन्ह्यांसंदर्भात तपास केला जात होता. वर्षाला सुमारे दहा ते बारा हजार अर्ज या विभागाकडे येत होते. त्यातून गुन्ह्यांची नोंद करून तपासणी केली जात होती. यासाठी स्थानिक ठाण्याची मदतही घेतली जात होती.
अपुरे मनुष्यबळ असल्याने गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांवर ताण येत होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे असावे, अशी मागणी पोलिस आयुक्तालयाने केली होती. त्यानुसार राज्याच्या गृहविभागाच्या वतीने १२ जूनला राज्याचे उपसचिव विनायक चव्हाण यांनी आदेश पारित केले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस ठाणे मिळणार आहे. त्यातून ऑनलाईन, सोशल मीडियासंदर्भातील गुन्हे आणि तक्रारींचा निपटारा होणार आहे.















