- ग्रामपंचायत सदस्याचे पद रद्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२४) :- मारुंजी ग्रामपंचायतचे सदस्य तानाजी वाघमारे यांचे सदस्यपद रद्द झाले आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या न्यायालयाने याबाबत निर्णय दिला.
वाघमारे हे वॉर्ड क्रमांक २ मधून अनुसूचित जाती या जागेवर २०२० साली झालेल्या निवडणुकीत बहुमताने निवडून आले होते. नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांनी जात पडताळणीसाठी असलेली पावतीदेखील सादर केली नव्हती. त्यांच्या जात पडताळणी दाखल्यात त्रुटी असल्याची तक्रार शशिकांत जगताप यांनी केली होती.
वाघमारे यांनी खोटा आणि पुरेसे कागदपत्रे नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे निदर्शनास येत होते. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी गुरुवार (दि. ११) रोजी निर्णय दिला आहे. त्यानुसार वाघमारे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे मारुंजी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची देखील निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा निकाल यासाठी देखील महत्वाचा आहे.















