न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२४) :- पिंपरी- चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पवनेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बुधवारी अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
सकाळी सात ते दुपारी पावणेदोन या वेळेत आठ ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे वाहनाचे नुकसान आणि वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तर एका ठिकाणी आगीची घटना घडली आहे. पवना नदीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे चिंचवडमधील महासाधू मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले आहे.
शहरातील विविध भागांमध्ये झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. निगडी परिसरातील बीजी कॉर्नर येथे भलेमोठे झाड उन्मळून पडले. हे झाड निगडी बस स्थानकाच्या मागील बाजूस दुचाकी व चारचाकी वाहणाच्या पार्किंग मध्ये असल्याने पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या सुमारे चार फोर व्हीलर वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्या वाहनात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पिंपळे गुरव सुदर्शन चौक, नवी सांगवी जिल्हा रुग्णालय, चिंचवड येथील टाटा मोटर्ससमोर, मोरेवस्ती परिसरात, बिर्ला हॉस्पिटलजवळ, थेरगाव डांगे चौक, पिंपरी वैभवनगर येथेही झाडपाडीच्या घटना घडल्या आहेत.












