- आठ मार्गिकांचा हा कॉरिडॉर बीओटी तत्त्वावर विकसित होणार..
- शिक्रापूर-चाकण-तळेगाव महामार्गाच्या उभारणीला वाटण्याच्या अक्षता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२४) :- तीस किमी लांबीचा इलेव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉर या प्रकल्पासह देशभरात आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रॉजेक्टना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यांची लांबी ९३६ किमी असून, त्यांच्या बांधणीसाठी ५० हजार ६५५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामध्ये आठ मार्गिकांचा समावेश आहे.
आठ मार्गिकांचा असलेला नाशिक फाटा-खेड हा हायस्पीड कॉरिडॉर बांधा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार साकारण्यात येणार असून, त्यासाठी ७,८२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
राष्ट्रीय महामार्ग-६० वर पुणे व नाशिकमध्ये हा इलेव्हेटेड कॉरिडॉर चाकण, भोसरी इत्यादी ठिकाणांहून येणाऱ्या किंवा तिथे जाणाऱ्या वाहनांसाठी सुखकर मार्ग होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे होणारी वाहतूक कोंडीदेखील या कॉरिडॉरमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. नाशिक फाटा ते खेड या दोन्ही बाजूंच्या दोन लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे ४/६ लेनमध्ये रूपांतरित करण्यात येईल.
आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिलेली मंजुरी ही भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना व महत्त्वाचे परिवर्तन करणारी ठरणार आहे. असे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक विकास वेगाने होईल, रोजगाराच्या संधी वाडतील, असेही मोदी म्हणाले.
प्रकल्पात यांचा आहे समावेश…
या कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये आग्रा-ग्वाल्हेर नॅशनल हाय-स्पीड कॉरिडॉर (६ मार्गिका), खरगपूर- मोरेग्राम नॅशनल हाय-स्पीड कॉरिडॉर (४ मार्गिका), थरड-डीसा- मेहसाणा-अहमदाबाद नॅशनल हाय-स्पीड कॉरिडॉर (६ मार्गिका), अयोध्या रिंग रोड (४ मार्गिका), रायपूर-रांची नॅशनल हायस्पीड कॉरिडॉरचा पथलगाव आणि गुमलादरम्यानचा ४ मार्गिका विभाग आणि कानपूर रिंग रोड (६ मार्गिका आदी प्रकल्पांचाही समावेश आहे.
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट देऊन चाकणच्या वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा केली होती. यावर तातडीने निर्णय घेण्यात आला आणि नाशिक फाटा ते खेड महामार्गाला मंजुरी दिली आहे. लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – डॉ. अमोल कोल्हे, खासदार…
केंद्रीय मंत्रिमंडळाने ७,८२८ कोटी रुपये किमतीच्या ३० किमी लांबीच्या ८ लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. हा कॉरिडॉर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण यांसारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल. माझ्या कालावधीत मी केलेल्या पाठपुराव्याला आता मूर्त स्वरूप आलं आहे. याचा निश्चितच आनंद झाला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार…पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवा आयाम यानिमित्ताने मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल. तसेच, शहरातील तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तमाम पिंपरी चिंचवडकर यांच्या वतीने मनःपूर्वक आभार. – महेश लांडगे आमदार, भोसरी विधानसभा…
नाशिक फाटा-चाकण-खेड कॉरिडॉर हा प्रकल्प कार्यान्वित होणार असला तरी, मुख्यतः वाहतुकीचा प्रमुख प्रश्न हा शिक्रापूर-चाकण-तळेगाव महामार्गाचा आहे. या प्रकल्पाचा समावेश यादीत न केल्यामुळे केंद्र सरकारने या महामार्गाच्या उभारणीला वाटण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. या मार्गावर अरुंद रस्ता, त्यात भलेमोठे खड्डे, आणि वाहतूक कोंडी यामुळे उद्योजक वर्गासह कामगार वर्ग देखील हैराण आहे. त्यामुळे चाकणमधील कंपन्या इतरत्र स्थलांतरीत होत आहेत. या मुख्य रस्त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी निवडणुकीत एका लोकप्रिय खासदाराला घरी बसवले. विद्यमान खासदार देखील त्याच वाटेवर आहेत. हे दुर्लक्ष त्यांना देखील भोवू शकते. त्यामुळे शिक्रापूर-चाकण-तळेगाव महामार्गाच्या वाहतूककोंडीचा प्रमुख प्रश्न सोडविण्यावर सत्ताधाऱ्यांनी लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते…












