- मागील वीस वर्षांपासून महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम रखडले..
- पोलिस आयुक्तांनी नुकताच घेतला आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०५ ऑगस्ट २०२४) :- चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाहणी करून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आढावा घेतला. कोंडीची समस्या सोडविण्यासाठी १८ उपाययोजना सुचविल्या. त्याबाबत संबंधित विभागांना त्यांनी सूचना दिल्या.
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक झाली होती. संबंधित विभागांकडून आढावा घेऊन उपाययोजना करण्याबाबत पवार यांनी सूचना केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त चौबे यांनी गुरुवारी (दि. १) रोजी चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पाहणी करून आढावा घेतला.
चाकण येथे संयुक्त वाहतूक नियोजन आढावा बैठक घेतली. खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, रस्ते विकास महामंडळ, खासगी कंपन्यांचे एचआर उपस्थित होते.
वाहतूककोंडीचा त्रास परिरसरातील नागरिकांना होत आहे. चाकरमान्यांनाही लेटमार्क पडत आहे. परिसरातील वाहतूककोंडी सोडवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. वाहतूककोंडीचे भिजत घोंगडे कायम आहे. तसेच अनेक वेळा किरकोळ अपघात होत आहेत. अनेक जण जायबंदी झाले आहेत.
नाशिक फाटा ते आळंदी फाटा, चाकण-खेड रस्ता, भीमाशंकर रस्ता, नाशिक रस्ता, भोसरी उड्डाणपूल, टोलनाका या रस्त्यांसह चाकण- तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावर वाहतूक कोडी असते. रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी मार्ग व पादचारी पूल (स्कायवॉक) तयार करणे. चाकण चौकामध्ये ‘स्कायवॉक’ उभारणे. कंपन्यांमधील पावसाचे पाणी रस्त्यावर येते. पाण्याचा निचरा व्यवस्था करावी. त्यासाठी एमआयडीसी व पीएमआरडीएने कंपन्यांची बैठक घ्यावी. रस्त्यावर वाहने उभी करू नयेत. संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी कंपन्यांसोबत बैठक घेऊन मोकळ्या जागेवर वाहने थांबतील याकडे लक्ष द्यावे.
कंपन्यांनी मनुष्यबळाचे नियोजन करून शिफ्टच्या वेळेमध्ये बदल करावा. कंपन्यांनी पार्किंगची व्यवस्था कंपन्यांमध्येच करावी. रस्त्यावर थांबलेल्या वाहनांवर कारवाई करावी. चाकण व महाळुंगे विभागातील मुख्य व इतर रस्त्यांवर कंपन्यांमधील, तसेच इतर मोठ्या वाहनांना शिक्रापूर-तळेगाव या मार्गावर सकाळी आठ ते ११ आणि सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत पूर्णतः बंदी करावी. मोठ्या वाहनांना धांबण्यासाठी भंडारा डोंगर आणि शिक्रापूर येथे ठिकाणे निश्चित करावीत. नियमित थांब्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर खासगी पार्किंग भाडेतत्त्वावर घ्यावी. एमआयडीसी रांजणगाव, ढाबे यांच्या पार्किंगमध्ये मोठी वाहने थांबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कंपन्यांना माहिती द्यावी. वाहने थांबवण्यासाठी भंडार डोंगर येथील जागेची पाहणी करावी. रस्त्यावरील अनधिकृत रिक्षा थांबे बंद करावेत. ती यादी आरटीओकडे देऊन रिक्षा जप्त कराव्यात. तेथे आरसीपी पथकाची गाडी उभी करावी. एसटी, पीएमपीएल व खासगी बस, रिक्षा गर्दी होणाऱ्या ठिकाणांपासून १०० ते २०० मीटर लांब असावेत. शिक्रापूर-तळेगाव रस्त्याचे रुंदीकरण करून दुभाजक उभारावेत. रस्त्याच्या कडेला बाजार, हातगाडी, दुकाने थाटली असून त्यापुढे खरेदीसाठी वाहने उभी केली जातात. उलट दिशेने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करावी. चाकण चौकातील मजूर अड्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. मजूर अड्डा मार्केट यार्डसमोरील पीडब्ल्यूडी मैदानात स्थलांतरित करावा. रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवण्याची कारवाई करावी. बेकायदेशीर बांधकामे पाडून रस्ता रुंदीकरण करावा, नगरपरिषदेने अतिक्रमण काढून पाण्याचे नैसर्गिक स्रोत मोकळे करावेत. सामाजिक माध्यमांद्वारे परिसरातील ग्रुपवर शासन संस्थांविरुद्ध खोट्या अफवा पसरवल्या जातात. त्याची माहिती काढून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी. एमआयडीसीतील कंपन्यांच्या बस रस्त्यावर कोठेही थांबतात. त्यांना वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी बस उभी करण्याची कंपन्यांना नोटीस पाठवून समज द्यावी. मोठी वाहने रस्त्यावर बंद पडतात. त्यासाठी क्रेनची व्यवस्था करावी. सिग्नल यंत्रणा कार्यरत राहण्यासाठी चाकण विभागाच्या सहायक पोलिस आयुक्तांनी पाठपुरावा करावा, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करीत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत वाहतूक समस्येबाबत आढावा घेतला.
पुणे-नाशिक आणि चाकण-तळेगाव महामार्गावरील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे चाकण शहरासह पंचक्रोशीतील बहुतांश मार्गावर सतत वाहतूक कोंडी असते. मागील वीस वर्षांपासून महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम रखडले आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची गरज आहे.











