- दोन उपायुक्तांसह २५ बदलीपात्र अंमलदारांच्या पथकात नियुक्त्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन पोलिस उपायुक्तांच्या मंगळवारी (दि. २०) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी जारी केले आहेत.
बदल्या झालेल्यांमध्ये पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड व बापू बांगर यांचा समावेश आहे. विशाल गायकवाड यांच्याकडे सध्या वाहतूक विभागाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे परिमंडळ दोनची जबाबदारी देण्यात आली आहे. तर बापू बांगर यांची परिमंडळ दोनमधून वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे. बापू बांगर यांच्याकडे यापूर्वीही वाहतूक विभागाची जबाबदारी होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांची नेमणूक परिमंडळ दोन येथे केली होती.
दरम्यान पोलिस आयुक्तालयांतर्गत गुन्हे शाखेत बदली झालेल्या २५ अंमलदारांना गुन्हे शाखेतील विविध पथकांमध्ये नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकात आठ जणांना, खंडणी विरोधी पथकात सहा जणांना तर अमली विरोधी पथकात ११ जणांना नियुक्ती दिली आहे. अंतर्गत नियुक्त्यांचे आदेश गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिले.
मागील काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहर पोलिस दलातील अनेक अंमलदारांच्या बदल्या केल्या. एका ठिकाणी नियुक्तीचा कालावधी संपल्याने तसेच विनंतीवरून या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये गुन्हे शाखेत अनेकांची बदली झाली. गुन्हे शाखेत बदली झालेल्या अंमलदारांना विविध पथकांमध्ये नियुक्ती देण्यात आली.
अमली विरोधी पथकात निखिल वर्षे, निखिल शेटे, चंद्रकांत जाधव, जालिंदर गोरे, लक्ष्मण सूर्यवंशी, गोविंद डोके, किशोर परदेशी, जावेत बाग शिराज, गणेश कर्पे, शिल्पा कांबळे, प्रमोद कदम यांना नियुक्ती मिळाली. तसेच मालमत्ता गुन्हे विरोधी पथकात विशाल गायकवाड, सोमनाथ मोरे, बाबाराजे मुंडे, हर्षद कदम, अमोल गोरे, चंद्रकांत गडदे, नितीनकुमार उमरजकर, प्रशांत पाटील यांना नियुक्ती मिळाली. खंडणी विरोधी पथकात संदीप गंगावणे, प्रदीप पोटे, किशोर कांबळे, किरण जाधव, मंगेश जाधव, भूपेंद्र चौधरी यांची नियुक्ती झाली.












