न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी २००८ मध्ये स्थापन केलेल्या पुणे महानगर नियोजन समितीचे २०१६ मध्ये पुनर्गठण करण्यात आले. समितीला हक्काचे स्वतंत्र कार्यालय, मनुष्यबळ, यंत्रणा आणि निधीसाठी अनेक वर्षे पाठपुरावा केला होता. अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या समितीसाठी जागा निश्चित केली असून, येथील पीएमआरडीए कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आता या समितीचे कामकाज चालणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना भेटून फेब्रुवारी महिन्यात समितीच्या सदस्यांनी निवेदन दिले होते. त्याबाबत निधी आणि स्वतंत्र कार्यालय त्वरित उपलब्ध व्हावे, यासाठी मागणी केली होती. समितीचे सदस्य वसंत भसे, संतोष भेगडे, कुलदीप बोडके, प्रियांका मांगडे पठारे, दीपाली हुलावळे, दीपक हुलावळे, विजय भेगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नागरीकरण सुनियोजित पद्धतीने व्हावे, यासाठी राज्य शासनाने जुलै १९९९ मध्ये पुणे महानगर क्षेत्र घोषित केले. राज्यघटनेच्या ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर क्षेत्राची घोषणा केली. राज्य घटनेतील तरतुदी व महाराष्ट्र महानगर नियोजन समितीच्या (रचना व कामे) तरतुदी पुढे सुरू ठेवणे यासाठी नोव्हेंबर २००८ मध्ये पहिल्यांदा पुणे महानगर नियोजन समितीची स्थापना केली होती.
घटनेतील तरतुदीनुसार महानगर क्षेत्राकरिता प्रारूप विकास योजना तयार करण्याचे बंधन या समितीवरआहे. कामकाज करण्यासाठी अधिकारी, कर्मचारीवर्ग व कार्यालयाची आवश्यकता होती. मनुष्यबळ मिळण्यासाठीही पाठपुरावा केला होता. मध्यंतरी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांनी ‘पीएमआरडीए’ला त्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही केल्या होत्या.
पुणे महानगर नियोजन समितीला स्थापनेपासून अद्यापपर्यंत कार्यालय मिळाले नसल्याचे निदर्शनास आणून देत निवेदन दिले होते. त्यानुसार समितीसाठी कार्यालय उपलब्ध झाले आहे. यामुळे समितीचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
– वसंत भसे, सदस्य, पुणे महानगर नियोजन समिती…












