- महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारांच्या चाचपणीचा दिखावा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, महायुती आणि महाविकास आघाडीत तीन-तीन पक्ष असल्याने जागा वाटपाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात पिंपरीसाठी सर्वांत मोठी रस्सीखेच आहे. तिन्ही मतदारसंघांवर दोन्ही गटांतील पक्ष दावा सांगत आहेत. जागा वाटपानंतर होणाऱ्या संभाव्य बंडखोरीचा प्रतिस्पर्धी आघाडीने फायदा घेऊ नये, यासाठी दोन्ही गटांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचा दिखावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाचा घोळ सुरू होता. विधानसभा निवडणुकीत तरी तिढा सुटणार का, याकडे लक्ष लागले आहे.
तिन्ही मतदारसंघातून इच्छुकांची संख्या जादा आहे. पक्षाकडून तिकीट मिळेल, याची कोणालाच शाश्वती शाश्वती नाही. त्या कारणाने अपक्ष लढविण्याचीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळे प्रचारात पक्षांपेक्षा स्वतःचा चेहरा कसा मतदारांपर्यंत पोहोचेल याचीच काळजी इच्छुकांकडून घेतली जात आहे. विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षांना मिळाव्यात, असा दावा विद्यमान आमदारांचा आहे. त्या जागांवरील विद्यमान आमदारांनाच संधी द्यायची की दुसऱ्याला तिकीट द्यायचे हा निर्णय त्या-त्या पक्षाचा असणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पेचही कायम आहे. त्यामुळे शहरात वरचेवर पक्षांच्या वरिष्ठांच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांचे एकमेकांच्या हालचालीवर बारीक लक्ष आहे. महायुतीकडून पिंपरीची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेला जागा सुटणार आहे. अजित पवार गटाने विद्यमान आमदारांना तिकीट नाकारल्यास त्यांना दरवाजा उघडण्याची शरद पवार गटाने तयारी केली आहे. अजित पवार गटातून परतीचा ओघ सुरू झाल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी ही रणनीती आखली जात आहे. नेमक्या याच कारणामुळे अजित पवार गटाकडून शहराध्यक्षपद निवड लांबविल्याचीही चर्चा आहे.
चिंचवड आणि भोसरीत भाजपचे आमदार आहेत. चिंचवडमधील विद्यमान आमदारांचे तिकीट कापत शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीकडून भोसरी आणि चिंचवड या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी दावा सांगत आहे.


















