न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना व भामा आसखेड धरणातील वाटकेरी वाढले आहेत. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) वाणिज्यिक वापराकरिता पवना धरणातून ०.०५९१ दशलक्ष घन मीटर पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. तर भामा आसखेड धरणातून चाकण नगरपरिषदेला पिण्यासाठी ५.५६२ वाढीव दशलक्ष घन मीटर पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने पाणीकोटा वितरणास मान्यता दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेत, पुढील ५० वर्षाच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आता मुळशी धरणातून अतिरिक्त पाणीसाठा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील जलाशयांची संख्या मर्यादित असताना वाढत्या नागरिकरणामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने ती पूर्ण करताना जलसंपदा विभागाला आता उपलब्य जलशयांमधून ती पूर्ण करावी लागत आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच खासगी संस्थांकडूनही पाणी कोटा उपलब्ध करुन देण्याविषयी जलसंपदा विभागाकडे वारंवार मागणी होत आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चाकण नगरपरिषदेला घरगुती वापरासाठी पाणी कोटा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाला प्राप्त झाला होता. तर यापूर्वीच चाकण नगरपरिषदेला भामा आसखेड धरणातून ३.४८९६ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा मंजूर असून, त्याचा वापर नगरपरिषदेकडून केला जात आहे. तर शासन निर्णयानुसार बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी क्षेत्रिय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. नव्या शासन निर्णयानुसार चाकण नगरपरिषदेची २०१५ मधील लोकसंख्या लक्षात घेता ५.५६२ दशलक्ष घन मीटर पाणी कोट्यास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे.
दरम्यान, पीएमआरडीएच्या वतीने मावळ तालुक्यातील कुरवंडे येथे टायगर व लायन पॉइंट विकसित केला जात आहे. हे पॉइंट विकसित करण्यासाठी वाणिज्यिक वापरासाठी पाण्याची गरज भासणार असल्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाला प्राप्त झाला होता. याशिवाय याठिकाणी पर्यटकांचा वावर वाढणार असल्याने पाणीकोटा उपलब्ध करुन देण्याची या प्रस्तावात मागणी करण्यात आली होती. या योजनेसाठी २०५५ सालची लोकसंख्या लक्षात घेत पवना धरणातून ०.०५९१ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.
मावळ तालुक्यातील आंबी येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन अॅकॅडमीच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता, या संस्थेच्या वतीने वडिवळे धरणातून पाणीसाठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या योजनेची २०४१ सालची लोकसंख्या लक्षात घेऊन या संस्थेला पिण्यासाठी ०.१०६१ दशलक्ष घन मीटर पाणी कोटा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.


















