न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- काल दिनांक २७/सप्टेंबर रोजी पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये विषय ‘तहकूब’ प्रकरणावरून चांगलीच जुंपली.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वायसीएम रुग्णालय व निगडीमधील जलशुद्धीकरण केंद्र येथे सौरउर्जेतून वीज निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार असून वायसीएम आणि जलशुद्धीकरण केंद्रातील इमारतींचे छत तसेच टाकी पुढील २५ वर्षांकरिता वापरण्यासाठी ‘क्लीन मॅक्स’ या संस्थेस पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीने मान्यता दिली आहे.
पिंपरी -चिंचवड महापालिका या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ३ रु. ६२ पैसे / प्रती युनिट दराने २५ वर्षे वापराकरिता घेणार आहे.
यापूर्वी माहे सप्टेंबरच्या विषयपत्रिकेवर तीस-या क्रमांकावर हा विषय मान्यतेकरिता अंतर्भूत होता. सत्ताधारी भाजपने पक्षाच्या बैठकीमध्ये हा विषय तहकूब ठेवण्याचा निर्णय घेउन स्वपक्षाच्या नगरसेवकांना ‘व्हीप बजावला होता, परंतु सभेत अचानक सभागृह नेत्यांनी पक्ष-आदेश डावलुन हा विषय मंजूर करण्याकरिताचा ‘व्हीप’ स्व-पक्षाच्या नगरसेवकांना बजाविला.
सभागृह नेत्यांची खेळी ओळखून भाजपच्याच नगरसेविका सीमा सावळे यांनी या विषयास हरकत घेतली व ‘व्हीप’चे उल्लंघन कशाला करता? नगरसेवकांना वेड्यात काढून विषय मंजूर करण्यात येणार असेल तर, त्यास माझा विरोध असल्याचे त्यांनी सभागृहास निक्षून सांगितले.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या विषयात हस्तक्षेप करीत पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत तीस-या टप्यात समावेश झालेला असून आधीच या प्रकल्पास उशीर झालेला आहे, त्यामुळे विषयाला मंजूरी द्यावी अशी विनंती केली. आयुक्तांच्या विनंतीनुसार शेवटी महापौरांनी हा विषय मंजूर केला.
झालेल्या प्रकारानुसार सत्ताधारी भाजप व स्व-पक्षीय नगरसेवकांमध्ये सर्वच काही आलबेल आहे असे दिसून येत नाही. तसेच शिस्तबद्ध पक्ष अशी परंपरा असलेल्या भाजपच्या पारदर्शक कारभाराचे मनसुबे स्व-पक्षीय नगरसेवकांच्याच अंगलट येत असतील तर स्वपक्षीय नगरसेवकांना वाली तरी कोण असणार? असा प्रश्न सत्ताधारी भाजपच्या वर्तुळात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.