न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चऱ्होली प्रतिनिधी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने समाविष्ट भागाला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली आहे. प्रत्येक विकासकामात दिरंगाई ठरलेलीच. त्यामुळे या भागातील अनेक विकासकामे रेंगाळलेल्या अवस्थेत पहावयास मिळतात.
महापालिकेच्यावतीने च-होली फाटा ते च-होलीगाव या डीपी रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे, त्याची या कामात मनमर्जी चालू असून गेल्या कित्येक दिवसांपासून हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. अत्यंत संथ गतीने काम सुरु असून रस्त्यावरती कामाकरिता लागणारी साहित्य व त्याचे अवशेष अस्थाव्यस्थ पडलेली दिसतात.
त्यामुळे रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होत असून आजपर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर झालेले आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाय-योजना केलेल्या नाहीत. त्यामुळे या परिसरात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून नगरसेविका विनया तापकीर यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना मागणीचे निवेदन दिले, परंतु आयुक्तांकडून कोणतीही कार्यवाही या ठिकाणी करण्यात आली नाही.
या घटनेच्या निषेधार्थ नगरसेविका विनया तापकीर व राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने संबधित ठेकेदाराच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले व जोपर्यंत आयुक्त या ठेकेदारावर कारवाई करणार नाहीत तोपर्यंत टाळे काढणार नसल्याचा पवित्र यावेळी आंदोलकांनी घेतला असल्याचे तापकीर यांनी सांगितले.