महानगरपालिका कंत्राटी कामगारांच्या वेतनात भरघोस वाढ : बदरू जम्मा
कंत्राटी कामगारांना किमान वेतन देणारी पिंपरी चिंचवड महापालिका राज्यात तिसरी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२८ सप्टेंबर ) : कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील सर्व क्षेत्रातील असंघटीत कामगारांना किमान वेतन मिळावे म्हणून देशभर पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशाने असंघटीत कामगार कॉंग्रेस सेल, राज्य सरकारशी संबंधित सर्व आस्थापना, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, सर्व महामंडळे आणि सर्व महानगरपालिकांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे यासाठी लढा देत आहे.
याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागात नेमलेल्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनदर लागू करण्याबाबत नुकतेच मनपाने आदेश जारी केले आहेत. कॉंग्रेसच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे त्यामुळे हजारो कंत्राटी कामगारांच्या वेतनात भरघोस वाढ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदरू जम्मा यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सिद्धार्थ प्रभुणे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश कॉंग्रेसचे मागासवर्गीय विभाग उपाध्यक्ष गौतम आरकडे, समन्वयक रमेश व्यास, शीतल कोतवाल, इरफान शेख, मनोहर वाघमारे, सायरा शेख, तौफिक शेख, रमजान अत्तार, कलिंदर शेख, नवनाथ डेंगळे, संतोष रणसिंग आदी उपस्थित होते.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले की, हिंजवडी कासारसाई येथील बलात्काराच्या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीस आणि गुरुवारी नेहरूनगर चौकात एच.ए. कंपनीच्या पटांगणावर अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. त्या मृत मुलींना शहर कॉंग्रेसच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच अशा घटना रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले असून त्याचा निषेध सचिन साठे यांनी या वेळी केला. तसेच साठे म्हणाले की, प्रदेश सचिव सिद्धार्थ प्रभुणे यांनी नागपूर महापालिकेत याबाबत यशस्वी पाठपुरावा केला. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे नागपूर मनपाचे आयुक्त असताना त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याबाबत आदेश काढला होता.
त्या आदेशाची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनादेखील किमान वेतन मिळावे यासाठी सेलचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी मनपा प्रशासनाशी पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला. कॉंग्रेसच्या या लढ्याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या आदेशामुळेच यश आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या कामगारांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आहे. ठाणे व नागपूर महापालिकेने याची अंमलबजावणी यापूर्वीच केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेदेखील या आदेशाची सक्षमपणे अंमलबजावणी करावी व मागील फरकासह नियमित वेतनवाढ द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
सिद्धार्थ प्रभुणे यांनी सांगितले की, राज्यात अजूनही २३ महानगरपालिका, २२० नगरपरिषदा व १०७ नगरपंचायतींमधील ३ लाख पेक्षा जास्त कंत्राटी कामगार किमान वेतानापासून वंचित आहेत. महाराष्ट्र शासनाने “स्थानिक स्वराज्य संस्था” (ग्रामपंचायत वगळून) सर्व कंत्राटी कामगारांकरता २४ फेब्रुवारी २०१५ रोजी किमान वेतनाची अधिसूचना काढली. यानंतरही याची अंमलबजावणी होत नसल्याने २२ जानेवारी २०१६ मध्ये या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक काढले. यानंतर “असंघटीत कामगार काँग्रेसने केलेल्या पाठपुरावा व आंदोलनामुळे त्यावेळचे नागपूर मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत आदेश काढला. महाराष्ट्रात पहिल्यांदा नागपूर महापालिकेने कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याची अंमलबजावणी केली.
यामुळे नागपूर मनपात सुमारे ८ हजार पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांच्या पगारात दुपटीपेक्षा जास्त व वार्षिक एकूण ७० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची पगारवाढ झाली. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेने देखील सप्टेंबर २०१७ पासून ही आदेश काढून अंमलबजावणी केली. यानंतर एप्रिल२०१८ पासून असंघटीत कामगार काँग्रेसच्या पाठपुराव्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ही आदेश काढले, याबाबत आम्ही समाधानी आहोत. मात्र, मागील ३७ महिने सुमारे ६ हजार पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्काच्या किमान वेतानापासून वंचित ठेवण्यात आले, व प्रत्येक कामगारांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले, व सर्व कामगारांचे मिळुन एकत्रित १७५ कोटी पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झालेले आहे ही फरकाची रक्कम ताबडतोब मिळावी अशी मागणी आहे.
राज्य पातळीवर विचार करता सुमारे ३ लाख पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांचे प्रत्येकी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वांचे एकत्रित पणे सुमारे ९ हजार कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. पुढील काळात “असंघटीत कामगार काँग्रेस” महाराष्ट्रभर याबाबत जनजागृती करणार आहे. या सरकारकडूनच कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणार आहे, व कामगारांना न्याय मिळवून देण्याकरता संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी दुपारी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. दुपारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी ढोल वाजवून व साखर वाटून आनंद साजरा केला.
फोटोओळ : असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुंदर कांबळे, सचिन साठे, सिद्धार्थ प्रभुणे, संग्राम तावडे.