न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२५) :- सुप्रिया सुळे यांना पाच कोटींचा खासदार निधी मिळतो. रस्ता करायचा म्हटले तर या निधीतून करता येतो. एका मिनिटात त्या रस्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुळे यांना लगावला. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर येथील बनेश्वरच्या सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी उपोषण केले. यावर पिंपरीत पत्रकारांशी बोलताना अजित पवार बोलत होते.
शहरातील प्रश्नाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, चाकणपर्यंत मेट्रो नेण्यात येणार आहे. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंगरोडची कामे सुरू आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही रिंगरोडचे काम हाती घेतले जाणार आहे. ज्यांच्या जमिनी जातात, त्यांना मोबदला देण्यात येणार आहे. राज्यात धरणांतील पाण्यात घट होत आहे. याकडे सरकारचे लक्ष आहे. सद्यःस्थितीत धरणातील पाणी पावसाळ्यापर्यंत पुरेल यासाठी प्रयत्न केला जात आहे. भविष्यात शहरात पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे ठोकरवाडी आणि मुळशीतील धरणातून शहरासाठी पाणी आणण्यात येणार असल्याचे सांगितले. उद्योगांबाबत नवीन धोरण आणले जाणार आहे. पिपरी-चिंचवड शहरातील अनेक कारखाने बाहेर गेले आहेत. कोणत्या गोष्टीला परवानगी दिल्यानंतर रोजगार निर्माण होईल, याचा विचार करून धोरण तयार केले जात आहे. ते लवकरच जाहीर होईल.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २०२९ ला मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात पाच विधानसभा मतदारसंघ होतील, असेही ते म्हणाले आहेत. मुळा नदीबाबत बोलताना ते म्हणाले, सरकार म्हणून आम्ही नदी सुधार योजना राबवत आहोत. पण भविष्यात पाण्याचे संकट आपल्यासमोर उभे ठाकणार आहे. त्या अनुषंगाने एक धोरण आणत आहोत. पहिल्यांदा पिण्यासाठी, नंतर शेतीला आणि त्यानंतर औद्योगिक वसाहतींना पाणी असे आपण ठरवले आहे. मुळा नदीकाठच्या वृक्षतोडीबाबत आणि नदी सुधारबाबत पर्यावरणवाद्यांचे मत जाणून घेतले जाईल. महापालिका, जलसंपदा विभाग आणि पर्यावरणप्रेमींसोबत बैठक घेतली जाईल. त्यानुसार प्रकल्प राबविला जाईल. ग्लोबल वॉर्मिंगचे हे संकट आहे, सर्वानी काळजी घ्यायला हवी. आपल्याकडे वृक्षतोड रोखायला हवी. नदी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.












