- पीएमआरडीए मुख्यालयात ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात; प्रा. रामनाथ खेडकर यांचे व्याख्यान…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.२७ फेब्रुवारी २०२६) :-“मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती ज्ञानाचा समृद्ध खजिना आहे. ४५ पेक्षा जास्त साहित्य प्रकारांनी नटलेली आणि ‘अमृतातेही पैजा जिंके’ असा वारसा सांगणारी ही भाषा जगातील अद्वितीय भाषांपैकी एक आहे. मराठी टिकली तरच आपली संस्कृती आणि ओळख टिकणार आहे, त्यामुळे मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा वसा सर्वांनी घ्यायला हवा,” असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व मराठीचे प्राध्यापक रामनाथ खेडकर यांनी केले.
मराठी राजभाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी मुख्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘घेऊया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा’ या विषयावर प्रा. खेडकर बोलत होते.
यावेळी बोलताना प्रा. खेडकर यांनी मराठीच्या ऐतिहासिक आणि साहित्यिक प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “जे ज्ञान मायबोलीतून मिळते, ते जगाच्या अन्य कोणत्याही भाषेतून मिळू शकत नाही. नेमकी हीच बाब ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजभाषेची मान्यता दिली होती. संतांचा उदात्त वारसा लाभलेल्या या भाषेने महाराष्ट्राला चार ज्ञानपीठ विजेते दिले आहेत. कुसुमाग्रजांनी मराठीला अटकेपार नेण्याचे कार्य केले, तोच वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे.”
या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांनी प्रास्ताविक केले. “मराठीच्या गौरववृद्धीसाठी आणि तिच्या संवर्धनासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला सहआयुक्त पूनम मेहता, डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपायुक्त हिंमत खराडे, राजेश माशेरे, दक्षता विभागाचे पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, विकास परवानगी विभागाच्या सहसंचालक स्मिता कलकुट्टी, तहसीलदार आशा होळकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांनी केले.












