न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ फेब्रुवारी २०२६) :- आज शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित “हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.
या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह मा.श्री.नरेंद्रजी पेंडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे प्रमुख उपस्थित म्हणून कार्यक्रमास लाभले. तसेच सांस्कृतिक वार्तापत्रचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत विक्री अधिकारी श्री. निखिल देविदास वझे हे देखील उपस्थित होते.
या ग्रंथामध्ये गेल्या शंभर वर्षांतील हिंदू समाजजागरणाची वाटचाल, विविध सामाजिक व राष्ट्रीय चळवळी,संघटनात्मक कार्य, विचारप्रवाह आणि संघर्षमय प्रवासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. समाजपरिवर्तन, सांस्कृतिक जतन,राष्ट्रीय अस्मिता आणि संघटनशक्ती यांचे ऐतिहासिक संदर्भांसह विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. विविध टप्प्यांवर आलेल्या आव्हानांचा उल्लेख करत त्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या चळवळींचे दस्तऐवजीकरण या ग्रंथात करण्यात आले आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना मा.श्री.नरेंद्रजी पेंडसे यांनी मराठी साहित्यातील नवरसांची ओळख करून दिली आणि म्हणाले की, मराठी भाषा ही समृद्ध साहित्यपरंपरा लाभलेली भाषा असून तिच्या माध्यमातून समाजमन घडते,असे त्यांनी नमूद केले.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक समरसता,कुटुंब प्रबोधन,पर्यावरण रक्षण,स्वबोध आणि नागरी कर्तव्य या पाच प्रमुख विषयांवर समाजात प्रबोधन करत असल्याची माहिती त्यांनी दिली.समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी या विषयांवर व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की,“‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ हा ग्रंथ केवळ इतिहासाचे दस्तऐवजीकरण नसून समाजजागृतीचा प्रेरणादायी प्रवास आहे. शंभर वर्षांच्या संघर्षातून उभा राहिलेला विचारप्रवाह आणि संघटनशक्ती यांची सविस्तर मांडणी या पुस्तकातून झाली आहे. आजच्या तरुण पिढीने आपल्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा ग्रंथांमुळे राष्ट्रीय अस्मिता अधिक दृढ होते आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. हा ग्रंथ समाजासाठी मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास आहे.”
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी नगरसेविका सौ.अनिताताई काटे,नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे,श्री. जयनाथशेठ काटे,श्री.संदेश काटे पाटील,श्री.राजाभाऊ मासूळकर,श्री.अभिजित बोरसे,श्री.अमित नेमाणे,श्री. संदीपशेठ काटे,श्री.संजय शेठ भिसे,श्री.दिनेश काटे पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना या अंकाचे वितरण करण्यात आले.
सोहळा उत्साहपूर्ण व विचारप्रवर्तक वातावरणात संपन्न झाला.











