- नवनिर्वाचित अध्यक्षांकडून पहिल्याच बैठकीत सभा तहकूबीचा निर्णय..
- महापौर निधीसाठी ५० कोटी तर, विकासकामांसाठी १,१८६ कोटींची तरतूद…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे ५६६०.७३ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे सादर केले. हे महापालिकेचे ४४ वे अंदाजपत्रक असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ९५ अन्वये सादरीकरण करण्यात आले.
आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ५६६०.७३ कोटी (आरंभीच्या शिल्लकीसह) उत्पन्न अपेक्षित असून ५६५५.७३ कोटी खर्च अपेक्षित आहे. मार्च २०२७ अखेर ५ कोटी रुपयांची शिल्लक राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नागरिकांचा वाढता सहभाग
‘Participatory Budget’ अंतर्गत नागरिकांकडून एकूण ४,९९६ सूचना प्राप्त झाल्या असून त्यापैकी २९७ सूचना स्वीकृत करण्यात आल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सहभाग दुप्पट झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
विकासकामांना प्राधान्य
महापालिकेच्या विकासकामांसाठी १,१८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थापत्य विशेष योजनांसाठी ४३६.९४ कोटी, महापौर निधीसाठी ५० कोटी, जेंडर बजेट अंतर्गत महिलांसाठी ९९ कोटी, दिव्यांग कल्याणासाठी ६८.३० कोटी तर शहरी गरीब (BSUP) योजनेसाठी १,९५३ कोटींची तरतूद आहे.
पाणीपुरवठा भांडवली कामांसाठी १५५.७३ कोटी, पीएमपीएमएलसाठी ४०० कोटी, भूसंपादनासाठी १०० कोटी, स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी, अमृत २.० साठी ५४.४५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
करसंकलनात वाढ
जानेवारी २०२६ अखेर मालमत्ता करापोटी ७०० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. २०२५-२६ मध्ये ७९% कर ऑनलाईन पद्धतीने वसूल झाला. सर्वंकष सर्वेक्षणात ९.४३ लाख मालमत्तांना क्रमांक देण्यात आले असून ७.६२ लाख मालमत्तांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे.
प्रमुख प्रकल्पांची प्रगती
नवी प्रशासकीय इमारत
३१२.२० कोटी खर्चाच्या या इमारतीचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
मोशी येथे ७०० खाटांचे जनरल हॉस्पिटल
४३३.४८ कोटींच्या या प्रकल्पात दोन विंगपैकी एका विंगचे सहा मजले व दुसऱ्या विंगचे चार मजले पूर्ण झाले असून वर्षभरात प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ड्रेनेज मास्टर प्लॅन
२,९३८.०२ कोटी खर्चाच्या या योजनेत नवीन एसटीपी उभारणी व सिव्हर नेटवर्क पुनर्वसनाचा समावेश आहे.
सिटी सेंटर प्रकल्प
१,०१५ कोटींच्या DBFOT मॉडेलवरील सिटी सेंटर प्रकल्प प्रस्तावित टप्प्यात असून २६.१८ एकर जागेवर मिश्र वापर विकास केला जाणार आहे.
स्थायी समितीकडे सादरीकरण
नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्प पूरक करण्यासाठी बुधवार दि. ४ रोजी दुपारपर्यंत सभा तहकूब करण्यात आली आहे. सदस्यांच्या उपसूचना स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली.
एकूणच २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा पायाभूत सुविधा, आरोग्य, पाणीपुरवठा, गृहनिर्माण व शहरी विकासाला चालना देणारा असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.











