- महापालिकेने धाडल्या हजारांवर नोटीसा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाची आज डेंग्यू, मलेरिया आणि इतर डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी विशेष बैठक पार पडली. या बैठकीत डेंग्यू मलेरियाच्या अनुषंगाने घरांची तपासणी करणे, कंटेनर तपासणी करणे, भंगार दुकानाची तपासणी, औषध फवारणी, तसेच डेंग्यू आणि मलेरियाबाबत उपाययोजना आणि दंडात्मक कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सध्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विशेष मोहीम देखील राबवत आहे. या मोहिमे अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
घरांची तपासणी : एकूण १ लाख ८४ हजार १०६ घरांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ७९ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. कंटेनर तपासणीत ९ लाख ५६ हजार ४१८ कंटेनरपैकी ३ हजार ४०१ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. ४४२ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. बांधकाम स्थळे ६९७ बांधकाम स्थळांची तपासणी करून त्यामध्ये अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले. नोटीस व दंड एकूण १ हजार २९२ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या असून १२२ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करत ३ लाख ३६ हजार इतकी दंडची रक्कम वसूल करण्यात आली.
डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी देखील आपले घर व परिसरात डासांची उत्पत्ती होण्यास प्रतिबंध घालावा. वारंवार सूचना देऊनही अंमलबजावणी होत नसेल तर होणाऱ्या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका…












