न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड ही काळाची गरज बनली आहे. झाडे लावणे हे सोपे काम असले तरी ती जगवणे आणि ती संवर्धित करणे हेच खरे कार्य आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे व शहर सुंदर व हरित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
महापालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागच्या वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी सिंह बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्माण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहीम उपक्रम हाती घेतला आहे.
या वृक्षारोपण अभियानांतर्गत शहरात दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये ताम्हण, बहावा, नीम, शिसव या वृक्षांसारख्या विविध देशी व पर्यावरणपूरक प्रजातींची झाडे लावली जाणार आहेत. तसेनअन्य देशी झाडांच्या प्रजांतीचा देखील समावेश आहे. या झाडांची निवड जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच स्थानिक हवामानाशी सुसंगत राहील यासाठी करण्यात आली आहे.
















