न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २९ नोव्हेंबर २०२५) :- राज्यातील महापालिका निवडणुका घेण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिकांनी राजकीय आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे आवश्यक दुरुस्ती करणे तुलनेने सोपे असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्य सरकार व निवडणूक आयोग महापालिका निवडणुका आधी घेण्याच्या शक्यतेवर गंभीर विचार करीत आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी फक्त या दोन महापालिकांच्याच आरक्षणात मर्यादा वाढ झालेली असून, ती ५० टक्क्यांच्या आत आणण्यासाठी किरकोळ बदल पुरेसे ठरणार आहेत. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी अधिक व्यापक कार्यवाही करावी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिका निवडणुकांबाबत न्यायालयाने कोणतीही आडकाठी न आणल्याने, निवडणूक आयोग डिसेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळते. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकांच्या घडामोडींना आता गती मिळण्याचे संकेत आहेत.












