- निविदा, कार्यादेश आणि काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी व अपघातांचा धोकाच जास्त…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२५):- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांभोवती प्रस्तावित असलेल्या रिंगरोडसह तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाबाबत विधिमंडळात चर्चा झाली असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या अडचणींवर तातडीचा तोडगा अद्यापही दूरच असल्याचे चित्र आहे. वाहतूककोंडी कमी होईल, असा दावा करण्यात येत असला तरी काम सुरू होण्यासच किमान तीन महिने आणि पूर्णत्वास दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत नागरिकांनी त्रास सहन करायचा का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
आमदार सुनील शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारकडे माहिती मागितल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली. तळेगाव–चाकण–शिक्रापूर हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असूनही रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, अरुंद पट्टे आणि वाढलेली वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या महामार्गासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर असली तरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठीच किमान तीन महिने लागणार आहेत.
दरम्यान, पुणे रिंगरोडच्या पश्चिम विभागाची कामे मे २०२७ पर्यंत आणि पूर्व विभागाची २०२८ पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती देण्यात आली. म्हणजेच, शहरातील अंतर्गत वाहतूक मोकळी होण्यासाठी नागरिकांना किमान दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, चाकण आणि शिक्रापूर परिसरातील वाहनचालकांना वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि अपघातांचा धोका सहन करावा लागणार आहे.
तात्पुरत्या उपाययोजनांबाबत केवळ “तपासणी करून निर्णय घेतला जाईल” असे आश्वासन देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात खड्डे बुजवणे, संकेत फलक, प्रकाशयोजना यासारख्या मूलभूत उपाययोजना कधी होतील, याबाबत कोणतीही ठोस वेळमर्यादा सांगण्यात आलेली नाही. सुमारे ३,९२३.८९ कोटींच्या भव्य प्रकल्पाच्या घोषणा होत असताना, आजच्या दैनंदिन त्रासावर मात्र ठोस उत्तर मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.












