अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा आणि आनंददायी उपक्रम ‘‘Starlit Adventures 2025’-नववाटेचे घडणारे शिल्पकार’ या संकल्पनेअंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकत्रित सहभागातून साकारलेला एक संस्मरणीय आनंदोत्सव ठरला.
या कार्यक्रमाला नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे (नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट), संस्थेचे कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे,तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर, मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शाळेच्या विस्तीर्ण पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येऊन स्वयंपाकाचा उपक्रम राबवला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध चटपटीत व पौष्टिक पदार्थ तयार केले. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी एकत्र बसून सामूहिक भोजनाचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे परस्पर स्नेह, सहकार्य व संघभावना अधिक दृढ झाली.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. खेळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह, सक्रिय सहभाग आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. शाळेच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या तंबू घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर प्रसन्न व उत्सवी वातावरणाने उजळून निघाला.
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामुळे शालेय जीवनात एक वेगळाच, संस्मरणीय अनुभव विद्यार्थ्यांना लाभला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत विविध पारंपरिक व मैदानी खेळांचा आनंद घेतला.
याप्रसंगी बोलताना माननीय आमदार अमित गोरखे म्हणाले,
“अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थी व शिक्षकांमधील संवाद वाढवतात, त्यांच्यातील नाते अधिक मैत्रीपूर्ण बनवतात. यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास घडून येतो.”
कार्यक्रमाबाबत बोलताना मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, त्यांना शालेय जीवनातील आनंददायी आठवणी मिळाव्यात यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते. यासाठी शाळेच्या सर्व विश्वस्तांचे त्यांना नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते.
एकूणच ‘Starlit Adventures 2025’हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला असून नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेतील सर्व घटकांनी या उपक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.












