- यावर लिहून आणली होती प्रश्नांची उत्तरं…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या वतीने आयोजित पोलीस भरती २०२४-२५ च्या लेखी परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला उमेदवाराने स्वतःच्या जिन्स पॅन्ट आणि टॉपवर परीक्षेच्या विषयांची उत्तरे लिहून कॉपी करण्याचा प्रयत्न केला. ताथवडे येथील परीक्षा केंद्रावर रविवारी (दि. १५) सकाळी ९:४५ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
महिला पोलीस शिपाई यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी उमेदवारांची कसून तपासणी केली जात होती. यावेळी संबंधित महिला उमेदवार संशयास्पदरीत्या वागत असल्याचे दिसून आले. तिची तपासणी केली असता, तिच्या जिन्स पॅन्टच्या खिशात उत्तरांच्या दोन चिठ्ठ्या सापडल्या. धक्कादायक म्हणजे, तिने स्वतः घातलेल्या जिन्स पॅन्ट आणि टॉपवरही परीक्षेच्या विषयाशी संबंधित उत्तरे लिहून आणली होती.
कोणतेही इलेक्ट्रॉनिक किंवा कॉपीचे साहित्य नेण्यास सक्त मनाई असताना, जाणीवपूर्वक गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या उमेदवारावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कुराडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












