- एकाला हॉकी स्टिकने बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ मार्च २०२६) :- रस्त्यावर टेम्पो मागे घेताना दुचाकीला झालेल्या किरकोळ धक्क्यावरून झालेल्या वादात, एका तरुणाला हॉकी स्टिक आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना काळेवाडीत घडली आहे.
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात निसार शेख, युसुफ निसार शेख, यासमीन शेख आणि शेहनाज शेख (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ अहमद शेख (वय ४०, रा. नढेनगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. १४) दुपारी १:२० च्या सुमारास फिर्यादीचा भाऊ नयुम हा त्याचा तीन चाकी टेम्पो घेऊन जात होता. समोरून रिक्षा येत असल्याने आणि जागा कमी असल्याने त्याने गाडी मागे घेतली. यावेळी पाठीमागे असलेल्या दुचाकीला टेम्पोचा धक्का लागला.
या कारणावरून आरोपींनी वाद उकरून काढत नयुम याला हॉकी स्टिक, दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनाही आरोपींनी मारहाण केली. या गोंधळात नयुम याचा मोबाईलही गहाळ झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












