- व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७. एप्रिल २०२६) :- वाकड परिसरात वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भुजबळ चौक येथील वाहतूक शाखेत घडलेल्या घटनेत आरोपींनी संगनमताने कारवाईदरम्यान घेतलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. संबंधित व्हिडिओच्या आधारे बदनामी करण्याची भीती दाखवत ५० हजार रुपये तसेच वाहनावरील दंडाची रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणी वरद चव्हाण याला पोलिसांनी अटक केली असून, इतर दोन संशयितांचा शोध सुरू आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खंडणी व संगनमताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राथमिक तपासात आरोपींनी जाणूनबुजून व्हिडिओचा वापर दबाव टाकण्यासाठी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या कामकाजात अडथळे निर्माण करण्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.










