न्युज पीसीएमसी नेटवर्क
चाकण / महाळूंगे: (दि. १८ एप्रिल २०२६) :- प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पोटच्या ६ वर्षांच्या मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या फरार प्रियकराला दक्षिण महाळुंगे पोलिसांनी अथक परिश्रमानंतर अटक केली आहे. राम विनायक कजेवाड असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी मृत मुलाच्या आईला पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला बसरिन मेहबूब शेख (वय २७, रा.अंबाजोगाई) ही विवाहित असून तिला तीन मुले आहेत. बसरिनचे तिचा शेजारी राम कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. चार महिन्यांपूर्वी ती आपला ६ वर्षांचा मुलगा आवेज याला घेऊन रामसोबत खेड तालुक्यातील कुरुळी येथे राहण्यास आली होती.
मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधात आवेज अडसर ठरत असल्याने, ४ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दोघांनी संगनमत करून आवेजला बाथरुममधील पाण्याच्या बादलीत डोके बुडवून आणि त्याचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटून त्याची अत्यंत क्रुरपणे हत्या केली.
घटनेनंतर हा खून नसून नैसर्गिक मृत्यू (हृदयविकाराचा झटका) असल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी बनाव रचला. आवेजचा मृतदेह कारमधून बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे नेण्यात आला. मात्र, मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून फिर्यादी इसाक शेख यांना संशय आला. त्यांनी तातडीने परळी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आई बसरिन शेख हिने गुन्ह्याची कबुली दिली, मात्र प्रियकर राम कजेवाड फरार झाला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी राम कजेवाड वारंवार जागा बदलत पोलिसांना चकवा देत होता. पोलिसांनी त्याचा तिरुपती (आंध्र प्रदेश) आणि अंबाजोगाई असा पाठलाग केला. अखेर १७ एप्रिल रोजी त्याला जेरबंद करण्यात यश आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सपोनि पुल्ली, संतोष जायभाये व तपास पथकातील अंमलदारांनी ही कामगिरी फत्ते केली.










