न्युज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १८ एप्रिल २०२६) :- परदेशवारीचे स्वप्न दाखवून आणि स्वस्त विमान तिकिटांचे आमिष देऊन एका व्यक्तीची १ लाख ६४ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दुर्गेश परशुराम चव्हाण (वय ४६, रा. मोशी प्राधिकरण) यांना आरोपी डेनिस पटेल (रा. खराडी, पुणे) याने लंडन ट्रिपसाठी विविध ऑफर्सचे आमिष दाखवले होते. आरोपीने चव्हाण यांचा विश्वास संपादन करून त्यांना मुंबई ते लंडन प्रवासासाठी एअर इंडियाच्या विमानाची तीन तिकिटे बुक करून देतो असे सांगितले.
७ मे २०२६ रोजीच्या प्रवासासाठी आरोपीने फिर्यादीकडून १ लाख ६४ हजार ७०० रुपये घेतले. मात्र, ही रक्कम एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर भरण्याऐवजी आरोपीने स्वतःकडेच ठेवून घेतली आणि फिर्यादीला ‘नॉन कन्फर्म’ (कन्फर्म नसलेली) तिकिटे देऊन त्यांची फसवणूक केली.
ही घटना १५ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ दरम्यान घडली आहे. १७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दुर्गेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी डेनिस पटेल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडसे करत आहेत.










