न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ एप्रिल २०२६) :- पिंपरीतील शगुन चौक परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाईचे चित्रीकरण करत असताना नगरसेविकेच्या पतीला दुकानदार व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यावेळी जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी फय्याज शेख उर्फ रिंकू (मालक, मुनाफ कलेक्शन), आरीफ शेख, मुल्लाजी, अरबाज, शोहेब, उमर, इरफान आणि इतर ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज आसवाणी (वय ६७, रा. पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक शगुन चौक येथे कारवाई करत असताना आसवाणी हे चित्रीकरण करत होते. त्यावरून आरोपींनी वाद घालत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ‘बांगलादेशात शूटर आहेत’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भारत वारे करत आहेत.











