- मद्यपींचा वावर वाढला; दारूंच्या बाटल्यांचा खच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ एप्रिल २०२६) :- भोसरी येथील पीएमपीएल चौक ते मॅगझिन चौक दरम्यान उभारण्यात आलेले चार मजली वाहनतळ एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. काही कोटी रुपये खर्चून उभारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वापराविना पडून असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यापारी आस्थापने असून, ग्राहकांची वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. परिणामी अवघ्या पाच मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनचालकांना पाऊण तासापर्यंत वेळ लागत होता.
ही समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने स्थानिक आमदार व नगरसेवकांच्या मागणीनुसार बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. या वाहनतळाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला होता.
मात्र, उद्घाटनानंतरही वाहनतळ सुरू न झाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी तातडीने वाहनतळ सुरू करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.











