न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २२ एप्रिल २०२६) :- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये शिरून ४ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत कोयत्याने दहशत माजविणाऱ्या तीन सराईत गुंडांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी दुकानातील साहित्यासह बाहेर उभी असलेल्या ग्राहकाच्या कारचीही तोडफोड केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण सतन कापरी (वय २०, रा. पिंपळे सौदागर) यांचे कुणाल आयकॉन रोडवर ‘द मोमोवाला’ नावाचे दुकान आहे. दि. २० एप्रिल रोजी रात्री ११:१० च्या सुमारास आरोपी दुचाकीवरून दुकानावर आले. त्यापैकी दोघांनी हॉटेलमध्ये शिरून फिर्यादीकडे ४ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. जेव्हा फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपींनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. एका आरोपीने हातातील कोयता फिर्यादीवर उगारला, तर दुसऱ्याने दुकानातील स्टूल उचलून काउंटर, लॅपटॉप आणि इतर साहित्याची तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी हॉटेलबाहेर उभी असलेल्या एका ग्राहकाच्या कारची काचही फोडून परिसरात दहशत निर्माण केली.
या प्रकरणी सोपान गजानन बुलाखे (वय २१, रा. पिंपळे सौदागर), ओंकार उद्धव बाबर (वय २०, रा. पिंपळे सौदागर), विवेक विनोद अंबोरे (वय १८ रा. पिंपळे सौदागर) या तीन आरोपींच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत. पिंपळे सौदागर सारख्या गजबजलेल्या भागात झालेल्या या राड्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.











