न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ एप्रिल २०२६) :- महाराष्ट्र दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत पद्मभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित ‘जाणता राजा’ हे भव्य ऐतिहासिक महानाट्य सादर होणार आहे. हा नाट्यप्रयोग १ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानात रंगणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे राहणार असून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘जाणता राजा’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या शौर्यगाथा, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि मराठी अस्मिता प्रभावीपणे सादर करते. भव्य नेपथ्य, पारंपरिक वेशभूषा, जिवंत प्राणी आणि शेकडो कलाकारांचा सहभाग यामुळे हा प्रयोग प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, या उपक्रमातून नव्या पिढीला शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











