- भरदिवसा झालेल्या गोळीबारात भाजप कार्यकर्ता ठार..
- हल्लेखोरांच्या सलग फायरिंगमुळे परीसरात थरथराट..
- संतप्त नातेवाईक आणि समर्थकांची रुग्णालयात गर्दी…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुरोड (दि. २९ एप्रिल २०२६) :- देहुरोड शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली असून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते रमेश रेड्डी यांचा यात मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि. 28) रोजी पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करत एकामागोमाग अनेक गोळ्या झाडल्या.
या हल्ल्यात रमेश रेड्डी गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. तत्काळ त्यांना देहुरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच देहुरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तींनी अग्निशस्त्राचा वापर करून हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तत्काळ परिसर सील करून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.
डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सवाना चौक परिसरात ही घटना घडली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. वैयक्तिक वाद की इतर कोणता हेतू होता, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि समर्थकांनी रुग्णालय परिसरात गर्दी करत आक्रोश व्यक्त केला. काहींनी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह पुढील तपासासाठी पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर देहुरोड बाजारातील अनेक दुकाने तातडीने बंद ठेवण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.











