न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जगताप डेअरी ते वाकड परिसरात अनधिकृत बांधकामांवर आज सकाळी व्यापक कारवाई करण्यात आली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभारलेल्या सुमारे ६,९४५ चौ. मी. अतिक्रमणासह ३३ पत्रा शेड्स हटविण्यात आले. यापूर्वी १०४ मालमत्तांची यादी तयार करण्यात आली होती. न्यायालयीन स्थगिती असलेल्या मालमत्ता वगळता उर्वरित सर्वांवर नियमानुसार कारवाई झाली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. १५० कर्मचारी, १०४ पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या कारवाईत सहभागी झाले होते. १६ जेसीबी, अग्निशमन दल आणि ॲम्बुलन्सचीही तयारी ठेवण्यात आली होती.
अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.












