न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २९ एप्रिल २०२६) :- सिगारेटचे पैसे मागितल्याच्या वादातून तरुणावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तळवडे येथील गणेशनगर परिसरात घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव चंद्रकांत तांबारे (वय २५, रा. मोशी) यांनी साई रत्न पान शॉप येथे आरोपींकडे सिगारेटचे पैसे मागितले. त्यावरून आरोपी सचिन सुनिल पुणासे व भुषन संजय सुरडकर (दोघेही वय २५) यांनी वाद घालत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रात्री सुमारास दोघांनी मोटारसायकलवर येत प्लास्टिक पिशवीतील पेट्रोल तांबारे यांच्या अंगावर फेकले आणि पेटती काडी फेकून जाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.












