- अपघाताच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांना निवेदन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० एप्रिल २०२६) :- शिवसेना जिल्हा संघटक तथा पुणे सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना शहरातील विद्युत पोलवरील बेकायदेशीर केबल संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरात ऑप्टिकल फायबर केबलसाठी डक्टची सुविधा उपलब्ध असूनही अनेक टेलिकॉम व इंटरनेट कंपन्या सेवा वाहिन्या थेट विद्युत पोलवरून टाकत आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होऊन बकालपणा वाढत आहे. उड्डाणपूल, चौक तसेच झाडांवर केबलचे गुंते लोंबकळत असून ते नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
दि. २८ एप्रिल रोजी निगडी, सेक्टर २६ येथील प्रबोधन सोसायटी परिसरात श्रीमती संपदा पाटवर्धन यांचा केबलमुळे अपघात होऊन मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. वेळेत कारवाई झाली असती तर हा अपघात टळला असता, असा आरोपही करण्यात आला आहे.
निवेदनाद्वारे सर्व बेकायदेशीर केबलची चौकशी, जबाबदारांवर कारवाई, धोकादायक केबल हटविणे, कायमस्वरूपी उपाययोजना व मृतांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या फायबर डक्टचा प्रभावी वापर होत नसल्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.











