- स्थापना दिन, कामगार दिन व मराठी राजभाषा दिनानिमित्त महापालिकेचा संयुक्त सोहळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य प्रशासकीय भवनात रवि लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ‘राकट देशा, कणखर देशा’ ही ओळ महाराष्ट्राच्या जिद्दीची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडची ओळख भक्ती, शक्ती व श्रम यांच्या संगमातून घडल्याचे नमूद केले. चापेकर बंधूंचा वारसा, मोरया गोसावींची परंपरा आणि औद्योगिक प्रगती यांचा उल्लेख त्यांनी केला.
यावेळी जनगणना २०२७ संदर्भात एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी स्वयं-नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.













