- चेक बाऊन्स झाल्याने प्रकार उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) :- निगडी परिसरात दुहेरी परताव्याचे आमिष दाखवून २२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ फेब्रुवारी २०२६ ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत प्राधिकरण निगडी येथील आयकर कर्मचारी निवास, सेक्टर नं. २६ येथे घडला.
या प्रकरणातील आरोपी कुणाल काशिनाथ साबळे (वय ३६, रा. जुनी सांगवी, पुणे) याने स्वतःच्या व कुटुंबीयांच्या तीन कंपन्या असल्याचे सांगून फिर्यादी महिलेला बनावट कागदपत्रे दाखवली. संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास १० दिवसांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष त्याने दाखवले.
आरोपीवर विश्वास ठेवून फिर्यादी महिलेने वेळोवेळी आरोपीच्या बँक खात्यात एकूण २२,५०,००० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपीने फायद्याच्या रकमेपोटी २५ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, हा धनादेश बँकेत जमा केल्यानंतर खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो बाऊन्स झाला.
गुंतवणुकीची रक्कम व नफा परत मागितल्यावर आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार उघडकीस आला. यानंतर फिर्यादी महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करीत आहेत.













